हिंदू धर्मियांनी वेदांमध्ये संपूर्ण विश्व म्हणजे एक कुटुंब आहे अशी
सुंदर संकल्पना प्राचीन काळात मांडली होती. वेद हे आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी लिहिलेले प्रार्थना ग्रंथ. त्यांनाच पुढे धर्मग्रंथांची मान्यता
मिळाली आणि मग सारी गडबड झाली. या ग्रंथांमध्ये अनेक सुंदर विचार मांडले आहेत.
ते कृतींमध्ये फारसे उतरले नाहीत हा भाग
निराळा. संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी ते धर्मग्रंथ व त्यातील विचार आहेत हाही तद्दन खोटा दावा. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले हे ग्रंथ होते. त्यातील
विचारही त्यांच्यासाठीच लागू होते. त्यामुळे कोणी जर ते अखिल मानवतेसाठी व्यक्त
केलेले विचार होते वगैरे दावे करू लागले की मला हसायला येतं. पण अर्थात आता परिस्थिती
बदलली आहे कारण काळ बदलला आहे. त्यामुळे या धर्मग्रंथातील काही सुंदर विचारांचा
अवलंब ब्राह्मणेतरांनी केला तर त्याला कोणी काही हरकत घेणार नाही. दुसरं असं की
असे विचार स्वतंत्रपणे देखील कोणाच्याही मनात जन्माला येऊ शकतात. त्यासाठी
ब्राह्मण असण्याची पूर्व अट नाही.
तर या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी कल्पना आहे की संपूर्ण
जगत हे चैतन्यमयी आहे. सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये वसणारं हे चैतन्य सजीव व
निर्जीव चैतन्य आहे जे एकच आहे. आता ही अतिशय सुरेख अशी कल्पना आहे. मनुष्य व
मनुष्येतर जीवांमध्ये आणि इतकंच नाहीतर अचेतन वस्तूंमध्येही एकत्वाचा धागा जोडणारी
ही संकल्पना आहे. त्यामुळेच हिंदूंमध्ये निसर्गाची, प्राणीमात्रांची, वनस्पतींची पुजा
करण्याची पद्धती आहे. दगडांना, शस्त्रांना, दागिण्यांनाही इथे पुजलं जातं. (इतकी
उदात्त कल्पना व तिचे आचरण करणारे उदात्त लोक असूनही नंतरच्या काळात या धर्माची
अवनती का झाली याचं कोणालाही नवल वाटेल. अर्थांत त्याला विविध काळांतील अहंमन्य
लोकांची जडबुध्दी कारणीभूत आहे हे सत्य कोणत्याही विचारी माणसाला सहज जाणवेल.) या
संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे हे संपूर्ण जगत हे एकच एकक आहे. त्याला एकच
अस्तित्त्व आहे आणि एकच मन आहे. यालाच आपण वैश्विक मन म्हणूया. या वैश्विक मनात कोणताही
भेदाभेद नसतो. याला काळाचे नियम लागू होतात पण इतर कोणत्याही मानवी परिमाणांमध्ये
याचं मोजमाप करता येत नाही. आपण जीवंत आहोत तोवर या वैश्विक अस्तित्त्वाचे आणि या
वैश्विक मनाचे भाग असतो. आपलं काही कर्तृत्त्व असेल तर आपण गेल्यानंतरही आपल्या
कर्तृत्त्वाचा काही एक भाग या वैश्विक अस्तित्त्वात कायमस्वरूपी टिकून राहू शकतो. ही
सारी प्रस्तावना यासाठी कारण मी स्वतःला या वैश्विक अस्तित्त्वाचा एक भाग मानतो.
माझी असलीच तर ही एकच ओळख मला मनापासून सांगाविशी व स्वीकाराविशी वाटते. मी
स्वतःला या वैश्विक मनाची एक चेतना समजतो. या विश्वाचं जेवढं
वय आहे तेवढंच वय मी माझंही समजतो. या सामूहिक वैश्विक मनाचा जो अपरंपार ज्ञानसाठा
आहे त्याचा वैश्विक वारसा मला लाभला आहे अशी माझी धारणा आहे. एकदा याची प्रचिती
आल्यावर इतर सर्व गोष्टी मला गौण वाटतात.