Thursday, 22 February 2018

विश्व माझे मी विश्वाचा

हिंदू धर्मियांनी वेदांमध्ये संपूर्ण विश्व म्हणजे एक कुटुंब आहे अशी सुंदर संकल्पना प्राचीन काळात मांडली होती. वेद हे आर्यांनी म्हणजेच ब्राह्मणांनी लिहिलेले प्रार्थना ग्रंथ. त्यांनाच पुढे धर्मग्रंथांची मान्यता मिळाली आणि मग सारी गडबड झाल. या ग्रंथांमध्ये अनेक सुंदर विचार मांडले आहेत. ते कृतींमध्ये फारसे उतरले नाहीत हा भाग निराळा. संपूर्ण हिंदू धर्मियांसाठी ते धर्मग्रंथ व त्यातील विचार आहेत हाही तद्दन खोटा दावा. ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी लिहिलेले हे ग्रंथ होते. त्यातील विचारही त्यांच्यासाठीच लागू होते. त्यामुळे कोणी जर ते अखिल मानवतेसाठी व्यक्त केलेले विचार होते वगैरे दावे करू लागले की मला हसायला येतं. पण अर्थात आता परिस्थिती बदलली आहे कारण काळ बदलला आहे. त्यामुळे या धर्मग्रंथातील काही सुंदर विचारांचा अवलंब ब्राह्मणेतरांनी केला तर त्याला कोणी काही हरकत घेणार नाही. दुसरं असं की असे विचार स्वतंत्रपणे देखील कोणाच्याही मनात जन्माला येऊ शकतात. त्यासाठी ब्राह्मण असण्याची पूर्व अट नाही.
 तर या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी कल्पना आहे की संपूर्ण जगत हे चैतन्यमयी आहे. सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये वसणारं हे चैतन्य सजीव व निर्जीव चैतन्य आहे जे एकच आहे. आता ही अतिशय सुरेख अशी कल्पना आहे. मनुष्य व मनुष्येतर जीवांमध्ये आणि इतकंच नाहीतर अचेतन वस्तूंमध्येही एकत्वाचा धागा जोडणारी ही संकल्पना आहे. त्यामुळेच हिंदूमध्ये निसर्गाची, प्राणीमात्रांची, वनस्पतींची पुजा करण्याची पद्धती आहे. दगडांना, शस्त्रांना, दागिण्यांनाही इथे पुजलं जातं. (इतकी उदात्त कल्पना व तिचे आचरण करणारे उदात्त लोक असूनही नंतरच्या काळात या धर्माची अवनती का झाली याचं कोणालाही नवल वाटेल. अर्थांत त्याला विविध काळांतील अहंमन्य लोकांची जडबुध्दी कारणीभूत आहे हे सत्य कोणत्याही विचारी माणसाला सहज जाणवेल.) या संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे हे संपूर्ण जगत हे एकच एकक आहे. त्याला एकच अस्तित्त्व आहे आणि एकच मन आहे. यालाच आपण वैश्विक मन म्हणूया. या वैश्विक मनात कोणताही भेदाभेद नसतो. याला काळाचे नियम लागू होतात पण इतर कोणत्याही मानवी परिमाणांमध्ये याचं मोजमाप करता येत नाही. आपण जीवंत आहोत तोवर या वैश्विक अस्तित्त्वाचे आणि या वैश्विक मनाचे भाग असतो. आपलं काही कर्तृत्त्व असेल तर आपण गेल्यानंतरही आपल्या कर्तृत्त्वाचा काही एक भाग या वैश्विक अस्तित्त्वात कायमस्वरूपी टिकून राहू शकतो. ही सारी प्रस्तावना यासाठी कारण मी स्वतःला या वैश्विक अस्तित्त्वाचा एक भाग मानतो. माझी असलीच तर ही एकच ओळख मला मनापासून सांगाविशी व स्वीकाराविशी वाटते. मी स्वतःला या वैश्विक मनाची एक चेतना समजतो. या विश्वाचं जेवढं वय आहे तेवढंच वय मी माझंही समजतो. या सामूहिक वैश्विक मनाचा जो अपरंपार ज्ञानसाठा आहे त्याचा वैश्विक वारसा मला लाभला आहे अशी माझी धारणा आहे. एकदा याची प्रचिती आल्यावर इतर सर्व गोष्टी मला गौण वाटतात. 

Tuesday, 30 May 2017

#स्वजाणीव

स्वजाणीव आणि स्वार्थ यांत मोठा गुणात्मक आणि नैतिक फरक आहे. स्वार्थ तुम्हाला तुमचं एकट्याचं भलं कसं करता येईल यासाठी प्रेरीत होऊन काम करायला भाग पाडतो. स्वजाणीव तुम्हाला जगण्याचा अर्थ शोधण्यासाठी प्रोत्साहित करते. जगताना याची खरंच काही गरज आहे का हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचं उत्तर हे की ती गरज आहे. यासाठी की आपण जे काही जगतोय त्याला काहीतरी महत्त्व आहे का हे समजून घेण्यासाठी, आपण जे करतोय ते योग्य आहे का हे समजण्यासाठी आणि आपल्याला जीवंतपणी तसेच मेल्यानंतरही एक चांगली व्यक्ति एक उत्तम माणूस म्हणून लोकांच्या स्मरणात राहायचं आहे की नाही यासाठी. ही तिसरी गोष्ट आपण एकवेळ सोडून देऊयात. पण बाकी दोन गोष्टींसाठी तरी स्वजाणीव असायलाच हवी. कारण आयुष्यात कधीतरी आपण या गोष्टींचा विचार हा करतच असतो. स्वजाणीव तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करत असते. आता ही स्वजाणीव नेमकी काय भानगड आहे हे आधी समजून घेऊ यात. मी माणूस आहे, माझ्या या जगातील अस्तित्वाला काही  एक कारण व उद्देश आहे, माझ्यामुळे या जगात काही भर पडू शकते किंवा उणीव राहू शकते, मी इतरांना आदर्श ठरू शकतो, कोणत्याही बाह्य कारणांशिवाय केवळ स्वतःच्या चांगुलपणामुळे, मी एक उत्तम आयुष्य व्यतित करू शकतो हे कळणं म्हणजे स्वजाणीव होणं होयं. आपण बिचारे आहोत, गरीब आहोत, कमनशिबी आहोत, निरर्थक आहोत असं ज्यांना वाटतं त्यांना आपल्या सामर्थ्याची, ख-या स्वरुपाची कधीच जाणीव होऊ शकत नाही. माणूस असणं म्हणजे काय हेच त्यांना उमगत नाही. त्यामुळे इतर सजीव प्राणी आणि ते यांच्यात काही फारसा फरक आढळत नाही. स्वजाणीव तुम्हाला या फरकाची जाणीव करून देत असते. त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावून घ्या. मी जे करतोय ते योग्य आहे का, माझ्यासाठी योग्य असेल तर इतरांसाठीही योग्य आहे का, माझ्यामुळे जग बदलू शकतं का, निदान मी तरी बदलू शकतो का, मला माझ्या अस्थिर व अनपेक्षित आयुष्याची जाणीव आहे का, या प्रश्नांची उत्तर जर हो अशी असतील तर तुमचा स्वजाणीवा उघड होत आहेत असं म्हणता येईल. 

Saturday, 27 May 2017

भाग ३ - धर्म धर्म ग्रंथ देव इत्यादी

१-       याच्याशी आपला काय संबंध आहे असं वाटणा-या, समजणा-या सर्वांसाठी -
                          दहशतवाद वाढण्यासाठी दहशतवादी जितके जबाबदार असतात त्याहीपेक्षा त्यांच्या अशा कारवायांना वेळीच विरोध न करणारे तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक जास्त जबाबदार असतात. केवळ धर्माचा संबंध आहे म्हणून आम्ही दरवेळी गप्प बसतो आणि या लोकांचं फावतं. या धार्मिक दहशतवादाविरूद्ध लढणारे जे लोक आहेत ते कायम एकाकी पडतात. आपल्यापैकी कितीजण त्यांना प्रत्यक्षपणे पाठींबा देत सहकार्य करतात? आपल्यातील किती लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात? जवळपास नगण्य. फिल्मी नटनट्या, मूर्ख राजकारणी, बिनडोक धार्मिक नेते आणि संस्था यांना लाखोंनी फॉलो करणारे आपण जे आपल्यासाठी लढतात त्यांना मात्र काडीचीही किंमत देत नाहीत. जेव्हा एखादा हल्ला घडतो तेव्हा तेवढ्यापुरते ओरडणं, शांती मार्च काढणं अशा कमी वेळ खाऊ, सवंग लोकप्रियता देणारे फॅशनेबल विरोध करण्यातच आम्ही धन्यता मानतो. आणि पुन्हा दुसरा हल्ला होईपर्यंत आपल्या फुटकळ आयुष्यातल्या फुटकळ गोष्टींत रमून जातो. हा आळशीपणा, बेजबाबदारपणा आपल्याला सोडावाच लागेल. अन्यथा जे होत आहे त्यासाठी इतर कोणाला दोष देण्याचा आपल्याला काहीच नैतिक अधिकार नाही. आपल्या सर्वांना अगदी जाणीवपूर्वक या लढ्यात दहशतवादाविरुद्ध रान उठवावं लागेल, सर्व पातळ्यांवर, सातत्यानं. ज्या कोणी व्यक्ती, संस्था यासाठी काम करीत आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि ज्या कोणी व्यक्ती, संस्था या दहशतवादाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत आहे त्यांना सर्वठिकाणी कठोर विरोध करणं आपल्याला भाग आहे. एरव्ही उद्या जे काही होईल त्याला फक्त आपणच जबाबदार असू.
                          या सर्वांशी आपला काय संबंध आहे असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली आहे. हा दहशतवाद आता अगदी आपल्या घरात येऊन ठेपला आहे. आणि आज कोणीही कुठेही सुरक्षित राहू शकत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. मुख्य म्हणजे आपण हे अशासाठी करायचं की मारणारी आणि मरणारी आपलीच माणसं आहेत. जी मारताहेत ती विचारांनी भरकटलेली आणि कृतीभ्रष्ट झालेली माणसं आहेत, पण जी एकेकाळी आपल्यासारखीच होती, आपल्यासोबतच राहत होती. आणि जी मारली जाताहेत ती ही आपलीच माणसं आहेत. त्यामुळे आपल्याला हे करावंच लागेल. आणि यात सुजाण मुस्लिम समुदायालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. इथे मुल्लामौलवी, किंवा जमातेइस्लामी किंवा औवेसी यांच्यासारख्यांवर विश्वास ठेवून त्यांचं भलं होणार नाही हे आतातरी त्यांना मान्य करावं लागेल. इस्लाम शांतीचा संदेश देत असेल तर तो संदेश सा-या जगाला फक्त भारतीय मुसलमानच देऊ शकतात, पाकिस्तान, बांग्लादेश, आखाती व मध्यपूर्वेतील विचारदरीद्री देशातील मुसलमान समाज हे करू शकत नाही. तिथले उदार, सुधारणावादी मुस्लिमही हे करू शकत नाही कारण त्यांना एकतर ठार केलं जातं किंवा त्यांच्याच सरकारकडून त्यांना तुरूंगात डांबलं जातं. भारतात सुदैवानं असं होण्याची शक्यता नाही. एखादा प्रसंग तसा घडलाच तर त्याविरोधात आवाज उठवणारे लोक इथे मोठ्या संख्येत आहे जे धार्मिक भेदभावांपलीकडे जाऊन माणुसकीच्या रक्षणासाठी सदैव तयार असतात. पण त्यांच्यासोबत काम करायचं की आपल्याच कोशात राहून त्याच जुन्या मानसिकतेत जगत स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं याचा प्रत्येक मुसलमानानं, अमुसलमानानं आता विचार करायला पाहिजे.


Friday, 26 May 2017

भाग २ - धर्म, धर्मग्रंथ, देव इत्यादी

१-       भारतीय मुसलमानांसाठी -

                          भारतातील मुसलमान हा उग्र स्वभावी नाही. हिंदूंच्या दीर्घकालीन सहवासाचा हा परिणाम असू शकतो. सुफी परंपरा हे त्याचं उदाहरण आहे. हिंदू-मुसलमानांमधील सलोखा ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे. कारण जगात असं उदाहरण कोठेही नाही. पण हा सलोखा तोडण्यासाठी उत्सुक लोकं दोन्ही समाजांत आहेत हेही विसरून चालता येणार नाही. आणि जगातील दहशतवादाला आळा घालायचा असेल तर भारतातून ती सुरूवात व्हायला पाहिजे. कारण त्याला पोषक वातावरण इथे आहे. पण त्यात बरीच मजल गाठायची आहे. शरीया, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, फतवे, तलाक, निरक्षरता, गरीबी यातून सुटका करून मुस्लिम समाजाला बाहेर यावंच लागेल. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे धार्मिक श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून त्याला बाहेर पडावं लागेल. इस्लाम आणि पैगंबर हे अन्य धर्म व त्यांच्या अवतारांसारखेच आहेत, हे त्यांना मान्य करावं लागेल. जे मुस्लिम नाहीत तेही मेल्यावर त्यांच्या त्यांच्या स्वर्गात जातील, त्यांनाही मोक्ष मिळेलच हे त्यांनी मान्य करायलाच पाहिजे. त्यांच्यातली धार्मिक हेकेखोरी जोवर नष्ट होणार नाही तोवर त्यांची सुधारणा अशक्य आहे. आणि त्यासाठी आता अन्य धर्मियांनाही त्यांच्यावर दबाव आणायलाच पाहिजे. त्यांचं त्यांना काय करायचं ते करू देत ही वृत्ती आपल्याला आता परवडणार नाही. जितक्या धडाडीने हिंदू समाजात सुधारणा होत आहेत, धार्मिक कट्टरतेला विरोध होत आहे, तितकाच विरोध मुस्लिम समाजातही निर्माण व्हायला हवा. हा आता आपण व ते असा प्रश्न नाही तर आपण सारे माणसं आहोत व ते सिद्ध करण्याचा प्रश्न आहे. कोणाच्या काय भावना दुखतात ते दुखू देत पण आता शांत राहून चालणार नाही. मुस्लिम समाज जर एखाद्या बैलासारखा खाली बसलेला असेल तर त्याला तुराण्या टोचत पुन्हा चालायला भाग पाडावंच लागेल. ती आपलीही जबाबदारी आहे. 

Thursday, 25 May 2017

धर्म, धर्म-ग्रंथ, देव आणि अवतार

१-       आपल्या सर्वांसाठीच -

                          दहशतवादाचा धर्माशी आणि धर्माचा दहशतवादाशी संबंध असतो हे सत्य आपण एकदाचं मान्य करूया. धार्मिक व्यक्ती दहशतवादी असू शकतात आणि दहशतवादीही धार्मिक असतात हेही आपण एकदा मान्य करूया. कारण धर्माचा आणि चांगूलपणानं वागण्याचा किंवा न वागण्याचा काही एक संबंध नसतो. या गोष्टी कोणासाठी कितीही क्लेशकारक असल्या तरी त्या सत्य आहेत आणि त्याचा स्वीकार केल्यानं आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण अधिक मुक्त होऊ शकतो. त्यामुळे आयसीस, तालीबाँ, अल-कायदा आणि अन्य संस्था आणि त्यांचे तथाकथित जिहादी हे मुस्लिम दहशतवादाचे पुढारी आहेत हेही आपण स्वीकारूयात. या दहशतवादाशी आपला संबंध काय आणि त्यांच्या भानगडीत आपण कशाला लक्ष घालायचं असा विचार करणं आता शक्य नाही. बांग्लादेशात मारले गेलेले बहुतेक परकीय नागरीक होते. त्यांचं त्या दहशतवाद्यांशी काहीही शत्रूत्त्व नव्हतं. पण ते केवळ मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना मारलं गेलं. धर्म आणि देश यांच्या सीमारेषा मोडणारी ही घटना आहे. जिचा आपल्याशी अगदी जवळचा संबंध आहे. हे सारं काही उद्या अगदी आपल्याबाबतीतही घडू शकतं. आपल्या मित्रांच्या बाबतीतही घडू शकतं. आणि मुस्लिम समुदायानं कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कितीही आपला इस्लाम धर्म हा शांततेचा धर्म आहे याचा नारा दिला तरीही त्यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. इस्लाम शांतीचा धर्म आहे अशी त्यांची समजूत असेल आणि त्यावर त्यांचा विश्वास असेल तर ते त्यांना कृतीतून सिद्ध करावं लागेल.
                          इस्लामची स्थापनाच मूळात हिंसक प्रतिक्रियेतून झालेली आहे. तरवारीच्या बळावरच हा धर्म जगभर पसरला. शांतीचा धर्म म्हणून ज्या इस्लामची महती गायीली जातो तो इस्लाम नंतरच्या काळात जन्माला आला. पण त्याचा इतिहास पैगंबरापासून केवळ रक्तानेच लिहिला गेलेला आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. पैगंबर व त्यांच्या अनुयायांनी जे केलं ते त्यांच्यासोबत संपूष्टात आलं आहे. काळ बदलला आहे आणि त्या जुन्या गोष्टी आजच्या काळात योग्य ठरू शकत नाही व त्यांची पुनरावृत्ती ही कधीही कोणत्याही कारणासाठी योग्य व क्षम्य मानली जाऊ शकत नाही. बहुसंख्य मुस्लिमांची अडचण ही आहे की काळ बदलला आहे आणि त्यामुळे इस्लामची गरजही त्यानुसार बदलली पाहिजे हे त्यांच्या लक्षातच येत नाहीय. धर्माच्या बाबतीत ते अजूनही पैगंबराच्या काळातच जगत आहेत. त्यांचा बाह्य वावर आधुनिक जगात आणि आंतरीक वावर मात्र त्या गतकाळातच आहे. ही दुहेरी मानसिकता ते बदलणार नाहीत तोवर हा तिढा सुटणार नाही. मुल्लामौलवींच्या मूर्ख समजूतींपासून ते स्वतःला दूर ठेवणार नाहीत आणि त्याचा विरोध करणार नाहीत तोवर हा समाज प्रागतिक होणार नाही. मुस्लिम देशांकडे अमाप संपत्ती आहे पण विचारांच्या बाबतीत ते दरीद्री आहेत हे त्यांनी समजून घेतलं नाही तर हा दहशतवाद त्यांच्याच मूळावर उठणार आहे आणि त्याची सुरूवातही झाली आहे.
                          कोणत्याही सामाजिक प्रगतीला असलेला विरोध, महिलांच्या बाबतीत कायम हीन धोरण, कमालीचा एकांगिक आत्मश्रेष्ठत्वाचा अहंकार यामुळे हा समाज इतरांपेक्षा वेगळा पडतो. नव्हे तसं वेगळेपण जपण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. पण या वेगळेपणाच्या नादात ते जगापासून वेगळे होत आहेत याचा त्यांना विसर पडतोय. ज्या कोणत्याही धर्मांनं हे केलं ते नामशेष झाले आहेत किंवा त्याची जबरी किंमत तरी मोजली आहे. हिंदूंनी अस्पृष्यता, जातीवाद यापायी ही किंमत मोजली होती. पण सुदैवानं यात कायम महान समाजसुधारकांचा जन्म होत राहिला ज्यांना आणि ज्यांच्या विचारांना सामान्य जनतेनं पाठींबा दिला. नंतरच्या काळात आणि आजही हिंदूंमध्ये समाज सुधारणेचा झरा कायम वाहता राहिला आहे. त्यामुळे या धर्मात अनेक वाईट गोष्टी असल्या तरी त्याला विरोध करणारे प्रबळ विरोधकही असल्याने हिंदू समाजाची अवनती होण्याची शक्यता नाही. मुस्लिम मात्र याला अपवाद होतील अशी चिन्हं दिसताहेत. आपल्या घरातली घाण साफ करायला आधी आपण सुरूवात करायची असते, ती नाही केली आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना त्रास व्हायला लागला तर लोक शिव्या देणारच. मुस्लिम समाजात ज्या लोकांनी सुधारणेची कामं करू पाहिलीत त्यांना अतोनात त्रासच दिला गेला. आजही मुस्लिम समाज सुधारणा अत्यंत अवघड गोष्ट आहे. याचा आता यांनीच विचार करायला पाहिजे.
                          कुराण जगातलं एकमेव धार्मिक पुस्तक नाही, इस्लाम जगातला एकमेव धर्म नाही आणि पैगंबर जगातला एकमेव प्रेषित नाही हे मुस्लिमांनी मान्य करायलाच पाहिजे. जे मुस्लिम नाहीत ते जगण्यास नालायक आहेत, त्यांना मेल्यावर स्वर्ग मिळणार नाही ही असली भंपकबाजी आता त्यांनी बंद करावी. दिवसातून पाचदा नमाज पढणा-या आपल्या पोरांचा उदो उदो करण्यापेक्षा त्याचं शिक्षणाकडे लक्ष आहे की नाही, तो स्वतःचं पोट भरण्यासाठी लायक आहे की नाही याचा जास्त विचार मुस्लिम पालकांनी करण्याची गरज आहे. आपल्या बायकांना, मुलींना सन्मान देण्याची गरज आहे. स्वतःचं वेगळेपण जगण्याच्या नादात इतरांपेक्षा आपण वेगळे पडणार नाहीत याची काळजी घेण्याची ही वेळ आहे. आणि पाखंडी मुल्लांपेक्षा स्वतःच्या अकलेनं जगण्याची त्यांना आवश्यकता आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून आचाराविचारांतून जोवर हा धर्म जाणार नाही तोवर त्यांची सुधारणा होणं अशक्य आहे. आणि तोवर हा दहशतवादही संपूष्टात येणार नाही. कारण याचा संबंध या एरव्ही नगण्य भासणा-या गोष्टींशीच आहे. आजवर इतरांनी खूप सांभाळून घेतलंय मुस्लिम समाजाला पण आता त्यांनी स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. स्वतःचा संकूचित दृष्टीकोन त्यांनी बदलला नाही तर त्याची फळं इतरांना भोगावी लागण्याच्या आधी त्यांना स्वतःला भोगावी लागतील.
                          मुस्लिमांच्या या मूर्खपणामुळे इतर धर्मांतील लोकांनाही चेव येतो आणि तेही त्याचा उपयोग धार्मिक दहशतवाद वाढवण्यासाठी करतात हे हिंदू दहशतवाद्यांनी सिद्ध केलं आहे. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे सनातन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संस्था सौम्य दहशतवादाची पेरणी करत आहेत ज्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या सर्वांचा मूळ अजेंडा हा मुस्लिम किंवा ईसाई धर्म प्रसाराला उत्तर म्हणून त्यांना रोखणं इतकाच आहे आणि त्यासाठी हिंदूंमध्ये असूरक्षिततेची भावना जागृत करून ती कायम जागृत कशी राहिल यावर भर देण्यातच आहे. आणि मुस्लिम दहशतवादी घटनांमुळे त्यांचं काम सोपं होतं आणि त्यांच्या या कृत्यांकडे दूर्लक्ष होतं. मुस्लिम समाजाकडून या दहशतवादाविरूद्ध रोखठोक उत्तर मिळत नसल्यानं त्यांचा प्रतिवाद करणंही कठीण होतं. ही आपली जबाबदारी नाही, याचा धर्माशी किंवा सामाजिक सुधारणेशी संबंध नाही असले दावे निव्वळ हास्यास्पद आहेत. धर्मामुळे कट्टरता वाढते आणि अन्य धर्मिय लोकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढते हे सत्यच आहे. आपला समाज रसातळाला जातोय, आपली जगभर बदनामी होत आहे, हे पाहूनही मुस्लिम समाज सुधरत नसेल तर त्यांचच नुकसान होणार आहे. आणि सोबत जगाचंही. कारण जगात या धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे. सर्वदूर त्यांचं अस्तित्व आहे आणि प्रभावही आहे.
                          या हिंसाचारामागे राजकारण असेल आणि त्याच्या आडून दहशतवादी संघटनांना सत्ता संपादन करायची असेल असा एक मतप्रवाह आहे. सिरीयातील यादवीतून हे सिद्ध होतं. अफगानिस्तानात तालीबाँने तो प्रयत्न केला होता. इसीसच्या नावातच इस्लामिक स्टेटचा उल्लेख आहे. तसं जर असेल तर त्यांचा कोणतीही दयामाया न दाखवता बिमोड करण्यात यायला पाहिजे. आणि तो करताना त्यांच्या नावानं गळे फाडणा-या किंवा बंद पुकारणा-या लोकांवरही तीच कारवाई केली गेली पाहिजे. धर्माचा मुद्दा आला की आपण जरा जास्तच संवेदनशिल आणि सावध होतो. पण शिखांच्या खालसा प्रकरणात इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे सुवर्णमंदिरात कारवाई केली तोच आदर्श घेतला तर या मुस्लिम दहशतवादापासून सुटका होण्याची शक्यता आहे. यात राजकारणच आहे याची शक्यता यासाठीही आहे की आजवर या दहशतवाद्यांनी त्यांच्यासारखीच भडक भाषणं करणा-या परधर्मिय नेत्यांना मात्र लक्ष्य केलेले नाही. बांग्लादेशात ते ज्या ब्लॉगर्सना मारताहेत ते सुधारणावादी आणि कट्टर इस्लामच्या विरोधात बोलणारे उदार मुस्लिम किंवा हिंदू तरुण होते. भारतातही दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची व उदारमतवाद्यांची हत्या करण्यात आली जे सर्व धर्मीय सलोख्यासाठी आग्रही होते. अन्य देशांतही हेच दिसून येते. भारतात कधी विहिंप, सनातन, मुस्लिम लीग, बजरंग दल यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक ठार करण्यात आलंय असं दिसत नाही. जे सलोख्याच्या गोष्टी बोलतात, जे उदारमतवादी आहेत, ज्यांना माणूसपणाच्या विचाराची कदर आहे अशांनाच मारलं जातंय. आणि अर्थातच निष्पाप लोकांनाही ज्यांचा या सर्वांशीच काहीही संबंध नाही, ज्यांना केवळ दहशत पसरवण्यासाठी बळी दिलं जात आहे.

                          मुस्लिमांना कितीही वाईट वाटलं किंवा राग आला तरीही हे वास्तव त्यांना बदलता येणार नाही की त्यांच्या आडमूठ्या धार्मिक स्वभावामुळे त्यांचं नुकसान होत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपल्या धर्माची, प्रेषिताची मोकळेपणानं चिकित्सा करावीच लागेल. ती करायची नसेल तर त्यांना आपल्या खासगी व सार्वजनिक जीवनातून हद्दपार तरी करावं लागेल. माणूस म्हणून जगण्याची त्यांची धडपड जेवढी असेल तेवढं ते त्यांच्यासाठी व इतरांसाठीही चांगलं ठरेल. दहशतवाद हा निव्वळ दहशतवाद असत नाही त्याला काहीतरी अजेंडा असतो आणि धर्माच्या नावाखाली तो राबवला जात असेल तर तो धर्म आणि त्याचे लोक त्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. हिंदूंच्या सौम्य दहशतवादाचा धोका आपल्याला असला तरी हिंदू हे जगभरात नाहीत आणि त्यांचा एकूणच स्वभाव सौम्य असल्यानं ते उग्र होण्याचा धोका नाही. पण मुस्लिम समुदाय हा स्वभावतःचा आक्रमक असतो आणि त्यांच्या जागतिक अस्तित्त्वामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीचे पडसाद सर्वदूर उमटतात. ही घाण निपटून काढण्यासाठी जे प्रयत्न करताहेत त्यांच्या नृषंस हत्या केल्या जात आहेत. पण हे युद्धच आहे आणि यात बळी जाण्याची शक्यता असली तरी तो धोका स्वीकारुनही या समाजाला त्यासाठी लढावंच लागेल. त्यांच्या या लढाईत आमचा सहभाग असेलच पण त्याला मर्यादा आहेत व राहतील. कारण मूळात हे प्रत्येक मुस्लिमानं स्वतः किती धर्म साक्षर व धर्म उदार व्हावं यावर आधारीत आहे. आपल्याला सामाजिक सुधारणा हव्यात की नकोत हे त्यांनं ठरवायचं आहे. कुराण आणि प्रेषिताच्या तावडीतून सुटायचं की नाही हे त्यांनं ठरवायचं आहे. यांच्या पलीकडेही एक प्रचंड मोठं आणि वास्तव जग आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. असं मानण्यात त्यांचा अनादर नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. पण त्यांच्या आजच्या जगण्यात त्यांना अमर्यादीत स्थान नाही हेही त्यांना समजायला हवं.

१- मरण स्मरण

माणूस अमर नाही. कोणतीही सजीवच काय पण निर्जिव वस्तूही अमर नाही, सर्वकाळ टिकणारी नाही. अन्य सजीव प्राणी, निर्जिव वस्तू आणि माणसांत फरक काय तर आपल्याला मृत्युची जाणीव आहे. आपण कधीतरी मरणार आहोत याची आपल्याला कल्पना असते. हे आयुष्य अनिश्चित आहे याची आपल्याला माहिती असते. पण व्यवहारात फार कमी लोकांमध्ये ही जाणीव असल्याचं आढळून येतं. आपण आपल्याच रोजच्या कामांत इतके गुंतलेले असतो की मृत्युची आठवणही आपल्याला येत नाही. मरणाची आठवण नको म्हणून त्याची वाच्यता न करण्याकडेच आपला कल असतो. त्यामुळे रोज वर्तमानपत्रांमध्ये लोकांच्या मृत्युच्या बातम्या वाचूनही आपल्याला फारसं काही वाटत नाही. पण मरणारी व्यक्ति परिचयाची असेल तर मात्र आपल्याला धक्का बसतो व काही काळ तरी आपण यावर चिंतन करू लागतो. पण काही काळच. काही वेळांतच पुन्हा आपण जगण्याच्या मागे लागतो. तसाही त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. एखाद्याच्या जाण्यानं दुःखी होऊन आपलाही जीव जावा किंवा जीव द्यावा असं क्वचितच घडतं. इतर लोक मात्र जगतात. त्यात वाईट काहीच नाही. वाईट आहे ते या मरणाचं स्मरण न करणं. आपण अमर नाही, आपलं जीवन, ते जे काही काळ असेल, ते निश्चित नाही या गोष्टींचा विसर पडतो आपल्याला. त्यामुळे मरणासाठी आपण कधीच तयार नसतो ना आपले नातेवाईक. व्यवहारात या गोष्टींमुळे अनेक अडचणी येतात हे माहित असूनही आपण आपल्या मरणानंतरच्या परिस्थितीची कल्पना करून त्याप्रमाणे आपल्या घरच्यांसाठी काहीही तरतूद करून ठेवत नाहीत. हा व्यावहारिक भाग झाला. पण त्याहीपेक्षा आपण स्वतःही कधीच समाधानानं मरत नाही. तसे फार थोडे लोक समाधानानं मरतात. कारण प्रत्येकाला जगण्याचा मोह हा असतोच. पण हा मोह टाळता येणं यायला हवं. त्यासाठी मरणाचं स्मरण करणं हा एकमेव उपाय आहे. आपण अमर नाही आहोत आणि आपण कधीही मरू शकतो ही जाणीव जर सतत मनात असेल तर आपल्या जगण्यांत ब-याच गोष्टी आपण नीटपणे करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ज्याची गरज नाही अशा गोष्टींवर वेळ वाया घालवणे, आपल्या वागण्यानं इतरांना दुःख देणं, स्वतःलाही नको तो त्रास करून घेणे, भविष्याची काहीच जबाबदारी न घेणे, या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यासाठी सतत मृत्युची जाणीव मात्र हवी. याचा अर्थ आपण कायम तोंड वाकडं करून जगावं असा होत नाही. उलट हे जग मला उद्या दिसणार नाही त्यामुळे मी ते जास्तीतजास्त पाहण्याचा प्रयत्न करेन, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेईन, समोरच्याशी वागताना सांभाळून वागेन, स्वतःच्य़ा इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेईन, जेणेकरून उद्या मला अकाली मरण लाभलं तरीही तोवर मी एक समृद्ध आयुष्य जगलेलो असेन. लोक नुस्तेच जीवंत राहतात, फार कमी लोक जगतात. जगणं ही मरणापेक्षाही कठीण गोष्ट आहे. पण मरणाच्या स्मरणानं ही कठीण गोष्ट सोपी होऊ शकते.