माणूस अमर नाही. कोणतीही सजीवच काय पण निर्जिव वस्तूही अमर नाही,
सर्वकाळ टिकणारी नाही. अन्य सजीव प्राणी, निर्जिव वस्तू आणि माणसांत फरक काय तर
आपल्याला मृत्युची जाणीव आहे. आपण कधीतरी मरणार आहोत याची आपल्याला कल्पना असते.
हे आयुष्य अनिश्चित आहे याची आपल्याला माहिती असते. पण व्यवहारात फार कमी
लोकांमध्ये ही जाणीव असल्याचं आढळून येतं. आपण आपल्याच रोजच्या कामांत इतके
गुंतलेले असतो की मृत्युची आठवणही आपल्याला येत नाही. मरणाची आठवण नको म्हणून
त्याची वाच्यता न करण्याकडेच आपला कल असतो. त्यामुळे रोज वर्तमानपत्रांमध्ये लोकांच्या
मृत्युच्या बातम्या वाचूनही आपल्याला फारसं काही वाटत नाही. पण मरणारी व्यक्ति
परिचयाची असेल तर मात्र आपल्याला धक्का बसतो व काही काळ तरी आपण यावर चिंतन करू
लागतो. पण काही काळच. काही वेळांतच पुन्हा आपण जगण्याच्या मागे लागतो. तसाही
त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. एखाद्याच्या जाण्यानं दुःखी होऊन आपलाही
जीव जावा किंवा जीव द्यावा असं क्वचितच घडतं. इतर लोक मात्र जगतात. त्यात वाईट
काहीच नाही. वाईट आहे ते या मरणाचं स्मरण न करणं. आपण अमर नाही, आपलं जीवन, ते जे
काही काळ असेल, ते निश्चित नाही या गोष्टींचा विसर पडतो आपल्याला. त्यामुळे
मरणासाठी आपण कधीच तयार नसतो ना आपले नातेवाईक. व्यवहारात या गोष्टींमुळे अनेक
अडचणी येतात हे माहित असूनही आपण आपल्या मरणानंतरच्या परिस्थितीची कल्पना करून
त्याप्रमाणे आपल्या घरच्यांसाठी काहीही तरतूद करून ठेवत नाहीत. हा व्यावहारिक भाग
झाला. पण त्याहीपेक्षा आपण स्वतःही कधीच समाधानानं मरत नाही. तसे फार थोडे लोक
समाधानानं मरतात. कारण प्रत्येकाला जगण्याचा मोह हा असतोच. पण हा मोह टाळता येणं
यायला हवं. त्यासाठी मरणाचं स्मरण करणं हा एकमेव उपाय आहे. आपण अमर नाही आहोत आणि
आपण कधीही मरू शकतो ही जाणीव जर सतत मनात असेल तर आपल्या जगण्यांत ब-याच गोष्टी
आपण नीटपणे करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ज्याची गरज नाही अशा गोष्टींवर वेळ वाया
घालवणे, आपल्या वागण्यानं इतरांना दुःख देणं, स्वतःलाही नको तो त्रास करून घेणे,
भविष्याची काहीच जबाबदारी न घेणे, या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. त्यासाठी
सतत मृत्युची जाणीव मात्र हवी. याचा अर्थ आपण कायम तोंड वाकडं करून जगावं असा होत
नाही. उलट हे जग मला उद्या दिसणार नाही त्यामुळे मी ते जास्तीतजास्त पाहण्याचा
प्रयत्न करेन, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेईन, समोरच्याशी वागताना सांभाळून वागेन,
स्वतःच्य़ा इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेईन, जेणेकरून उद्या मला अकाली
मरण लाभलं तरीही तोवर मी एक समृद्ध आयुष्य जगलेलो असेन. लोक नुस्तेच जीवंत राहतात,
फार कमी लोक जगतात. जगणं ही मरणापेक्षाही कठीण गोष्ट आहे. पण मरणाच्या स्मरणानं ही
कठीण गोष्ट सोपी होऊ शकते.
No comments:
Post a Comment