१-
याच्याशी
आपला काय संबंध आहे असं वाटणा-या, समजणा-या सर्वांसाठी -
दहशतवाद
वाढण्यासाठी दहशतवादी जितके जबाबदार असतात त्याहीपेक्षा त्यांच्या अशा कारवायांना
वेळीच विरोध न करणारे तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक जास्त जबाबदार असतात. केवळ
धर्माचा संबंध आहे म्हणून आम्ही दरवेळी गप्प बसतो आणि या लोकांचं फावतं. या
धार्मिक दहशतवादाविरूद्ध लढणारे जे लोक आहेत ते कायम एकाकी पडतात. आपल्यापैकी
कितीजण त्यांना प्रत्यक्षपणे पाठींबा देत सहकार्य करतात? आपल्यातील किती लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो
करतात? जवळपास नगण्य. फिल्मी नटनट्या, मूर्ख राजकारणी,
बिनडोक धार्मिक नेते आणि संस्था यांना लाखोंनी फॉलो करणारे आपण जे आपल्यासाठी
लढतात त्यांना मात्र काडीचीही किंमत देत नाहीत. जेव्हा एखादा हल्ला घडतो तेव्हा
तेवढ्यापुरते ओरडणं, शांती मार्च काढणं अशा कमी वेळ खाऊ, सवंग लोकप्रियता देणारे
फॅशनेबल विरोध करण्यातच आम्ही धन्यता मानतो. आणि पुन्हा दुसरा हल्ला होईपर्यंत
आपल्या फुटकळ आयुष्यातल्या फुटकळ गोष्टींत रमून जातो. हा आळशीपणा, बेजबाबदारपणा
आपल्याला सोडावाच लागेल. अन्यथा जे होत आहे त्यासाठी इतर कोणाला दोष देण्याचा
आपल्याला काहीच नैतिक अधिकार नाही. आपल्या सर्वांना अगदी जाणीवपूर्वक या लढ्यात
दहशतवादाविरुद्ध रान उठवावं लागेल, सर्व पातळ्यांवर, सातत्यानं. ज्या कोणी व्यक्ती,
संस्था यासाठी काम करीत आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि ज्या कोणी व्यक्ती, संस्था
या दहशतवादाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत आहे त्यांना सर्वठिकाणी कठोर
विरोध करणं आपल्याला भाग आहे. एरव्ही उद्या जे काही होईल त्याला फक्त आपणच जबाबदार
असू.
या
सर्वांशी आपला काय संबंध आहे असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली आहे. हा
दहशतवाद आता अगदी आपल्या घरात येऊन ठेपला आहे. आणि आज कोणीही कुठेही सुरक्षित राहू
शकत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. मुख्य म्हणजे आपण हे अशासाठी करायचं की
मारणारी आणि मरणारी आपलीच माणसं आहेत. जी मारताहेत ती विचारांनी भरकटलेली आणि
कृतीभ्रष्ट झालेली माणसं आहेत, पण जी एकेकाळी आपल्यासारखीच होती, आपल्यासोबतच राहत
होती. आणि जी मारली जाताहेत ती ही आपलीच माणसं आहेत. त्यामुळे आपल्याला हे करावंच
लागेल. आणि यात सुजाण मुस्लिम समुदायालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. इथे
मुल्लामौलवी, किंवा जमातेइस्लामी किंवा औवेसी यांच्यासारख्यांवर विश्वास ठेवून
त्यांचं भलं होणार नाही हे आतातरी त्यांना मान्य करावं लागेल. इस्लाम शांतीचा
संदेश देत असेल तर तो संदेश सा-या जगाला फक्त भारतीय मुसलमानच देऊ शकतात, पाकिस्तान,
बांग्लादेश, आखाती व मध्यपूर्वेतील विचारदरीद्री देशातील मुसलमान समाज हे करू शकत
नाही. तिथले उदार, सुधारणावादी मुस्लिमही हे करू शकत नाही कारण त्यांना एकतर ठार
केलं जातं किंवा त्यांच्याच सरकारकडून त्यांना तुरूंगात डांबलं जातं. भारतात
सुदैवानं असं होण्याची शक्यता नाही. एखादा प्रसंग तसा घडलाच तर त्याविरोधात आवाज
उठवणारे लोक इथे मोठ्या संख्येत आहे जे धार्मिक भेदभावांपलीकडे जाऊन माणुसकीच्या
रक्षणासाठी सदैव तयार असतात. पण त्यांच्यासोबत काम करायचं की आपल्याच कोशात राहून
त्याच जुन्या मानसिकतेत जगत स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं याचा प्रत्येक मुसलमानानं,
अमुसलमानानं आता विचार करायला पाहिजे.
No comments:
Post a Comment